Well Subsidy : शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक असून पाण्याशिवाय शेतीचा विचार करणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे शेतकरी अलीकडच्या काळात शेतीसाठी शाश्वत पाण्याचे स्त्रोत किंवा शेतीला पाणी देण्यासाठी बोअरवेल, विहिरी तसेच शेततळे अशा उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.
यामधेही विहिरी किंवा बोअरवेलचे महत्व हे खूप जास्त आहे कारण पिकांसाठी किंवा शेतीसाठी सिंचनास मर्यादा येऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. शेतीला पाणी नसेल किंवा कोरडवाहू क्षेत्र असेल तर अशा ठिकाणी पाणी उपलब्ध न झाल्याने पिकांची उत्पादकता कमी होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
त्यानुसार कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्यांमध्ये सुरू करण्यात आली असून या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आता नवीन विहिरी खोदण्यासाठी अनुदान (Well Subsidy) दिले जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश या प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांमधील लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करण्यासोबतच शेतीसाठी संरक्षित पाण्याची सुविधा निर्माण करून पीक उत्पादनात वाढ करणे हा आहे.
विहीर अनुदानासाठी अटी (Well Subsidy)
1- ग्राम कृषी संजीवनी समितीने मंजूर केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत निवडलेली गावे, लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती/जमाती तसेच महिला, अपंग आणि इतर शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते.
2 – या प्रकल्पांतर्गत विहिरीचा लाभ घ्यायचा असेल, तर शेतकऱ्यांच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ०.४० हेक्टरपेक्षा जास्त असावे.
3- ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो आणि या योजनेचा आधीच लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळत नाही.
4- लाभार्थी निवडताना सर्वात महत्त्वाची अट म्हणजे विहीर आणि सार्वत्रिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत यांच्यातील अंतर पाचशे मीटरपेक्षा जास्त असावे.
5- याशिवाय, महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 नुसार, या योजनेंतर्गत घेण्यात येणारी विहीर आणि इतर आधीच्या विहिरींमधील अंतर 150 मीटरपेक्षा जास्त असावे.
6- तसेच ग्राम कृषी संजीवनी समितीने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांसाठी विहिरींची जागा निश्चित करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
7- नवीन विहिरीचे खोद काम करण्यासाठी आणि इतर बाबी पूर्ण करण्याकरिता जास्तीत जास्त 1 वर्षाचा कालावधी देण्यात येईल.
नवीन विहीर योजने अंतर्गत किती अनुदान दिले जाणार आहे?
नवीन विहिरींची निर्मिती या घटकांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नवीन विहिरींच्या बांधकामास दोन टप्प्यात 100% अनुदान देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार खोदकामाचा एकूण खर्च देण्यात येणार आहे.
आणि दुसरा टप्पा हा विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम पूर्ण झाल्याच्यानंतर अंदाजपत्रकानुसार दिला जाणार आहे. याद्वारे, 100% सबसिडी म्हणजेच 2.5 लाख रुपयांची सबसिडी लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक अकाऊंट मधे थेट जमा केली जाते.
अर्ज कुठे कराल?
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://dbt.mahapocra.gov.in वर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या की अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागणार आहेत.
एक टिप्पणी भेजें